Thursday, November 10, 2011

कलकत्त्याहून विमान गौहत्तीच्या दिशेनं झेपावलं कि काही मिनीटांतच डावीकडे एक अद्भुत द्रृष्य दिसू लागतं. दूरवर क्षितीजावर धीर-गंभीर हिमालयाची हिमाच्छादित उत्तुंग झळझळीत शिखरं म्हणजे जणु एखाद्या जागृत देवस्थानावरील सोन्याचे कळस. आजवर युरोपातले बरेच बर्फ़ाच्छादित डोंगर बघीतले पण जाणवतय ते असं की अशी उत्तुंगता, भव्यता तिथे नाही. हटकून दादा-वहिनीची आठवण झाली आणि हिमालयानी त्यांना लावलेलं वेड मला उमजलं. दुसरी आठवण नीलेशची छाया-प्रकाशाचं वेडच त्याला. क्षितीजावर पृथ्वीलोकाच्याही दशांगुळे वर असलेली काळ्या-करड्या आसमंताच्या पार्श्वभूमीवरची ती हिरण्यवर्णी सजावट पाहून तो नक्कीच हरखला असता.



नजर ट्प्प्याट्प्प्यानी खाली उतरावी तसं दिसतं की देवभूमीत उगम पावलेले खळखळणारे असंख्य जीवनस्त्रोत पठारांवर शांत तर झालेले आहेत पण तरीही एका अनामिक ओढीने ते सागराकडे झेपावतायत. परंतु ही मिलन-मुक्ती मिळवण्याच्या नादात भारतभूला सुजलाम् सुफ़लाम् करण्याचं कर्तव्य मात्र ते विसरणार नाहियेत...

0 comments: